श्रद्धांजली
अटलजींना मी पहिल्यांदा १९६७ मध्ये पाहिले व ऐकले. मी
शिक्षणासाठी
कर्नाल (हरियाणा) येथे होतो. जनसंघाने अटलजींची सभा आयोजित केलेली होती. मी तरुणपणा पासूनच निधर्मी विचारांचा होतो. त्यामुळे मला जनसंघा बद्दल आपुलकी वाटत नव्हती. पण आपल्याला न पटणाऱ्या मुद्द्यांवर इतरांचे काय म्हणणे आहे हे समजून घेण्याची वृत्ति मी कायमच जोपासत आलो आहे. त्या वृत्ति ने मला सभास्थानी ओढून नेले. सभेला फारतर हजार एक श्रोते असतील. (तेव्हा अटलजी फार लोकप्रिय नव्हते.) त्यामुळे मला अटलजींना
फार जवळून पाहता व ऐकता आले. अटलजींचे भाषण ऐकून मी अक्षरशः मंत्रमुग्ध झालो. हिंदुत्व बद्दलच्या माझ्या समजुतीत नवीन भर पडली. सभेच्या शेवटी कार्य कर्त्यांनी “हिंदुस्थान के भावी प्रधान मंत्री बाजपेयीजी की जय” अशा घोषणा दिल्या. त्याचे मला फारच हसू आले. कारण त्या वेळी ती बाब अशक्य प्रायच वाटत होती. मात्र एवढे नक्की की अटलजींचे भाषण हे माझ्या आयुष्यातील माझी राजकीय विचारधारा समृद्ध होण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरले. त्यांचे शब्द आता मला नेटकेपणे मांडता येणार नाहीत. पण मला त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण झाला व मला असे वाटू लागले की, इतका चांगला माणूस ज्या पक्षात आहे तो पक्ष फार वाईट असणे शक्यच नाही. मग मी जनसंघाच्या ध्येय धोरणांचा अभ्यास सुरु केला. मग माझ्या लक्षात आले की, त्यांचे आर्थिक धोरण जवळ जवळ स्वतंत्र पक्षा सारखे आहे, जे देशाच्या प्रगतीसाठी योग्य आहे.( त्या काळी राजगोपालाचारी यांनी स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष नावाचा एक पक्ष होता )
चांगला
वक्ता किंवा प्रभावशाली संसदपटू / विरोधी पक्ष नेता चांगला प्रशासक होऊ शकेलच असे नाही
असे नाही. मात्र अटलजींनी पंतप्रधान म्हणून २२ पक्ष्यांचे सरकार ज्या प्रकारे चालविले व देशाची जी प्रगती केली, ते पाहता त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व अधोरेखित होते. गणतंत्र भारतात (Republic India) नेहरूंच्या तोडीचा एकच माणूस झाला. तो म्हणजे अटलजी. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment